आषाढ वारी आळंदी ते पंढरपूर,पायी दिंडी,वारी मुक्काम
आषाढ वारी आळंदी ते पंढरपूर,
पायी दिंडी,वारी मुक्काम
स्वर रचना व स्वर गायन
डॉ सौ अनघा कुलकर्णी
आषाढ महिना पावसाळा आला
पंढरीच्या वारीचा भक्तांना लळा
माऊली माऊली शब्द झाले गोळा
दर्शनाची ओढ लागली मना
म्हणा जय हरी विठ्ठल ||1||
पहिल्या मुक्कामी आळंदी सोडली
पर्वतीची मिठी चरणा पडली
शनिवार वाडा दुसरे मुक्कामी
घोडा प्रदक्षिणा घाली
माऊलीच्या दर्शनाची ओढ लागली
म्हणा ज्ञानेश्वर माऊली।।2।।
तिसरा दिवस सासवड घाट
सोपानकाका दाविती मुक्तीची वाट
जेजुरी गडास चवथा दिवस
भंडारा उधळू पाहू म्हाळसाकांत
म्हणा जय मल्हार ।।3।।
पाचवे दिवशी वाल्हे मुक्कामी
रात्र दंगली कथा कीर्तनी
सहाव्या दिवशी निरे च्या काठी
न्हाती विठ्ठल रखुमाई।।4।।
सातव्या दिवशी आनंदी लोणंद
प्रती पंढरी वारकरी दंग
तरडगावी दत्त मंदिरी
आठवी रात्र राहे माऊली ।।5।।
नवव्या दिवशी फलटण
धन्य राजा घाली लोटांगण
दहाव्या वस्तीचे बिडणी बरड
वेड लावी जीवा नाथांचे भारुड
जय हरी विठ्ठल।।6।।
अकराव्या दिवशी विसाव्याला
दही धपाटे खा नातेपुत्याला
घोड्याचे रिंगण बाराव्या वस्तीला
म्हणा जय हरी विठ्ठल।।7।।
तेरावा मुक्काम माळशिरस चा
वेळापूर सोहळा चवदाव्याचा
भंडी शेगाव तोंडले बोन्डले
मुक्काम पंधरावा
ज्ञानेश्वर माऊली निघाली
भेटीस विठ्ठलाच्या ।।8।।
सोळाव्या दिवशी पालख्यांचा मेळावा
वारकरी रंगती वाखरी गावाला
माऊली निघाले पंढरपूरला
म्हणा जय हरी विठ्ठल।।9।।
माऊली येता पंढरपुराला
कोणती माऊली विठ्ठल कोणता
गोपाळ काला जमला सारा
दुमदुमले पंढरपूर
संत हर्षती, देव जमती
स्वर्ग उतरला पृथ्वीवर
विठ्ठल रखुमाई पंढरपूर
असे भक्तांचे माहेर
काय वर्णू मी वारीची महती
कंठ दाटला अपार
Comments
Post a Comment