international family day|आंतरराष्ट्रीय कुटुंब दिवस
आंतरराष्ट्रीय फॅमिली दिवस घरात बसुया, नात्यांची वीण घट्ट करूया चविष्ट पौष्टिक झणझणीत चमचमीत सणासुदीचे नात्यांचे ताट Dr Mrs Anagha Kulkarni आहारातून आरोग्य सुग्रास भोजनाचं ताट समोर वाढलं होतं. स्वादिष्ट पदार्थ ताटात छान वाढलेले. प्रत्येक पदार्थ जिथल्या तिथे. प्रत्येक पदार्थाला आपलीच वेगळी चव. आपलीच ठरलेली जागा. आपलं आयुष्य पण असंच तर आहे सुग्रास व्यंजनांनी भरलेलं ताट. जशी ताटात प्रत्येक पदार्थाची जागा ठरलेली असते तशीच आपल्या हृदयात आपल्या माणसांची, आपल्या नात्यांची. प्रत्येक नात्यात एक वेगळाच गोडवा. भोजन वाढण्याची सुरुवात होते मीठाने. डावीकडून. मीठ नसेल तर सारे पदार्थ अळणी, बेचव. हेच आपल्या आयुष्याचं सार. आपले आईवडील- ज्यांच्या मुळे जन्म मिळतो. ज्यांच्या शिवाय आपलं जीवन बेचव. मायेने डोक्यावरुन फिरणारे हात असावेत, पाठीवर कौतूकाची थाप मिळावी, आणि हिम्मत देणारे शब्द ऐकावे. ताटाच्या मध्यभागी गोड वरण भात. कालवून एकजीव झालेला वरण -भात. प्रयत्न करूनही एकदा कालवला की वरणभात वेगळा करताच येत नाही. हे असतं नवरा-बायकोचं नातं. थोड्याशा अवधीत किती एकजीव होतात ...