international family day|आंतरराष्ट्रीय कुटुंब दिवस
आंतरराष्ट्रीय फॅमिली दिवस
घरात बसुया, नात्यांची वीण घट्ट करूया
चविष्ट पौष्टिक झणझणीत चमचमीत सणासुदीचे नात्यांचे ताट
Dr Mrs Anagha Kulkarni
आहारातून आरोग्य
सुग्रास भोजनाचं ताट समोर वाढलं होतं. स्वादिष्ट पदार्थ ताटात छान वाढलेले. प्रत्येक पदार्थ जिथल्या तिथे. प्रत्येक पदार्थाला आपलीच वेगळी चव. आपलीच ठरलेली जागा.
आपलं आयुष्य पण असंच तर आहे
सुग्रास व्यंजनांनी भरलेलं ताट. जशी ताटात प्रत्येक पदार्थाची जागा ठरलेली असते तशीच आपल्या हृदयात आपल्या माणसांची, आपल्या नात्यांची. प्रत्येक नात्यात एक वेगळाच गोडवा.
भोजन वाढण्याची सुरुवात होते मीठाने. डावीकडून.
मीठ नसेल तर सारे पदार्थ अळणी, बेचव.
हेच आपल्या आयुष्याचं सार.
आपले आईवडील- ज्यांच्या मुळे जन्म मिळतो. ज्यांच्या शिवाय आपलं जीवन बेचव. मायेने डोक्यावरुन फिरणारे हात असावेत, पाठीवर कौतूकाची थाप मिळावी, आणि हिम्मत देणारे शब्द ऐकावे.
ताटाच्या मध्यभागी गोड वरण भात. कालवून एकजीव झालेला वरण -भात. प्रयत्न करूनही एकदा कालवला की वरणभात वेगळा करताच येत नाही. हे असतं नवरा-बायकोचं नातं. थोड्याशा अवधीत किती एकजीव होतात
वरणभातावर साजुक तुपाची धार नसेल तर त्या वरण भाताला काय चव ?
ही चव आपल्या जीवनात आणतात ती आपली मुलं ।
त्यांच्या शिवाय जीवन नीरस. आजी-आजोबांसाठी दुधावरची साय .
वरणभाताच्या थोडी वर असते साधी पोळी. कशीही लाटा, आपण देऊ तो आकार घेते . चांगली भाजून पानातल्या सगळ्या पदार्थांच्यात समरस होते.
ही आहे
आपल्या घरात ग्रहप्रवेश करणारी आपली सून
आल्या आल्या सगळ्या नात्यांचा अगदी मनापासून स्वीकार करते. सगळ्यांशी समरस होते
उजवीकडे असते भाजी. कधी रस्सा , कधी सुकी, कधी तिखट , कधी आंबटगोड। पण पानात अत्यंत आवश्यक.
थोडी असली तरी चालते पण पाहिजेच .
हे नातं असतं बहिण भावंडांचं
कधी प्रेमाचं, कधी मस्ती, कधी रुसवा फुगवा
एक तरी बहिण भाऊ असावाच. कधी अडचणीत हाक मारायला , कधी कौतुकाची थाप द्यायला तर कधी खंबीरपणे पाठीशी ऊभं रहायला. कधीतरी भांडायला सुद्धा !
पानात कधीतरी वाटीत असतं काहीतरी गोड किंवा काहीतरी पक्वान्न.
जे आपण रोज खातोच असं नाही पण जे असल्यावर जेवणाची लज्जतच न्यारी
हे आहेत आपले आप्तेष्ट .
आपले नातेवाईक. आपले सगेसोयरे.
रोज न भेटणारे पण सणासुदीला आणि समारंभात आवर्जून भेटणारे.
ज्यांच्या भेटीने आपले चारदोन क्षण
खूप मजेत जातात. ज्यांचं असणं गरजेचं आहे.
ही आपली विसाव्याची ठिकाणं असतात.
रोजच्या रहाटगाडग्यातून थोडासा विसावा.
जायला यायला काही हक्काची घरं.
मिठाच्या खाली असते लिंबू ,चटणी ,लोणचं.
आपल्या जेवणाची लज्जत वाढवणारी. तिखट चमचमीत चविष्ट ।
हे काम असतं आपल्या मित्र मैत्रिणींचं ।
आपल्या जीवनात हास्य आणणारे, सतत आशावादी असण्यास प्रेरित करणारे , आपल्या मदतीस धावत येणारे. आपले सुखदुखाःचे सोबती. आपल्या आयुष्याची रंगत वाढवणारे.
चटणी , लोणचं नंतर नंबर लागतो कोशिम्बीरीचा ।
कुठलीही असो, साधारण पौष्टिक.
कधी कधी भाजी नसली तर तिची जागा घेणारी,
भाजीच्या ऐवजी मदतीला धाऊन येणारी ।
हे झाले आपले शेजारी
थोडा राग लोभ असू शकतो, पण मनात किल्मिष न ठेवणारे. घरातल्या अडचणीत मदतीला धावत येणारे, प्रसंगी वडिलधाऱ्या ची जागा घेणारे.
पदार्थ आणि नात्यांतील साम्य आहे
प्रत्येक पदार्थाचा एक गुणधर्म, तसाच त्यात वापरलेल्या साहित्याचा सुद्धा.
जसा मीठाचा खारटपणा, साखरेचा गोड , चिंचेचा आंबट , मिरचीचा तिखट तर मेथीचा कडू.
कडवटपणा हा कार्ल्याचा गुणधर्म. तर ते कडू म्हणून आपण टाकून देतो का? नाही !! चिंच गूळ घालून त्याचा कडवटपणा आपण कमी करतो.
हेच नात्यांच्या बाबतीत. परिस्थितीने नात्यात कडवटपणा येऊ शकतो पण म्हणून आपण नातं विसरतो का? नाही
काही आंबटगोड आठ्वणींच्या सहाय्याने नात्यातला गोडवा परत आणण्याचा प्रयत्न करतो. तोंड कडू पडलं तर सुग्रास जेवण पण बेचव लागतं. म्हणून जेवण सोडतो का? नाही
आपल्या आवडीने चवीत थोडा बदल करतो. असाच बदल वेळोवेळी नात्यात पण करावा लागतो, नाती टिकवण्यासाठी , सांभाळण्यासाठी
पंचपक्वान्न समोर आहेत पण ठसका लागला तर पाणी देणारे कुणी नाही, पाठीवरून मायेने फिरणारे हात नाहीत, आपुलकीने हवं नको विचारणारे शब्द नाहीत तर ती पक्वांन्ने काय कामाची ?
पदार्थांत सगळे जिन्नस त्या त्या प्रमाणात असतील तर तो उत्कृष्टच होतो .
कशाचाही अतिरेक झाला की पदार्थ बिघडतो. नात्यात पण हवाच की रुसवा फुगवा, राग लोभ, प्रेम ,माया. कधी मत्सर सुद्धा.
पण सगळं प्रमाणात ।
प्रत्येक नात्यात प्रेम ,आदर , सन्मान आणि मर्यादा असतात.
त्याचा अतिरेक झाला की नाती
बिघडतात, मग ते प्रेम असलं तरी ।
एवढं सांभाळले तर दुरावा कधीच येणार नाही.
नाती आपल्यासाठी असावी आणि ती आपण मनापासून जपावी.
"नात्यांची चविष्ट पौष्टिक रेसिपी " तयार
म्हणजेच सुख समाधानाने भरलेले पंच पक्वान्न युक्त ताट
@dr anagha kulkarni
Happy family day
ReplyDelete